सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरला चालू होणार असला तरी, सोमवारपासूनच बहुतांशी साखर कारखान्यांची धुराडी पेटणार आहेत. त्यादृष्टीने साखर कारखाना व्यवस्थापनांचे प्रयत्न चालू आहेत. टोळ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झाल्या असून, दराची घोषणा काय होणार का ? याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.जिल्ह्यातील यशवंत (नागेवाडी, ता. खानापूर), डफळे (ता. जत), तासगाव (तुरची, ता. तासगाव) या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या हंगामामध्ये बंद राहण्याची शक्यता आहे. उर्वरित हुतात्मा, राजारामबापूची सर्व युनिट, केन अॅग्रो, सोनहिरा, उदगिरी शुगर, वसंतदादा (दत्त इंडिया), निनाईदेवी (दालमिया), क्रांती, महांकाली, माणगंगा, मोहनराव शिंदे या कारखान्यांनी गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे.वसंतदादा (दत्त इंडिया) कारखान्याचा गळीत हंगाम सोमवार, दि. ३० आॅक्टोबरपासून चालू होणार आहे. उर्वरित साखर कारखान्यांचेही गळीत हंगाम पुढील आठवड्यात चालू होणार आहेत. त्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापनाने तयारी पूर्ण केली आहे. कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३० आॅक्टोबरपाूसन पुढे चालू होणार असले तरी, यावेळी ते दर काय जाहीर करणार, याकडे शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे लक्ष आहे. कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करताना दराची घोषणा केली नाही, तर शेतकरी संघटनांची काय भूमिका असणार, याबाबतही चर्चा चालू आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाली असून, त्यांनी दर जाहीर केल्याशिवाय उसाचे कांडेही तोडू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटना चालू केली आहे. या संघटनेची दराबाबत काय भूमिका असणार हेही महत्त्वाचे आहे. शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेची ६ नोव्हेंबरला सांगलीत राज्यस्तरीय ऊस परिषद होणार आहे. या ऊस परिषदेत त्यांची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ऊस दराबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे त्यांची साखर कारखान्यांच्या दराबाबत काय भूमिका असणार, याकडेही शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे.सांगली जिल्ह्यात टोळ्या दाखलजिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून चालू होणार आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील ऊसतोड मजूरांच्या टोळ्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. वसंतदादा कारखान्याकडील दत्त इंडियाच्या टोळ्याही कारखाना परिसरात आल्या असून, तो परिसर गजबजला आहे. बैलगाडीचालक टोळ्या झोपड्या घालण्यामध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे.
कारखान्यांची धुराडी सोमवारपासून पेटणार, ऊस दराची घोषणा होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 11:58 AM