पुणे : उत्तर प्रदेशात साखरेच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता, साखरेच्या उपपदार्थांवर अनेक कारखान्यांनी लक्ष केंद्रीय केल्याने यंदा देशातील साखरेचे उत्पादन ३०७ लाख टनापर्यंत खाली येईल, असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी पेक्षा तब्बल १३ लाख टनांनी साखर उत्पादनात घट होणार आहे. गेल्या वर्षी देशात विक्रमी ३२० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा देखील त्याच आकड्याच्या आसपास उत्पादनाचा अंदाज होता. पावसाने दिलेली ओढ, महाराष्ट्रात हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत होती. नुकताच ३१० लाख टनांचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, त्यापेक्षाही कमी उत्पादन होईल असे आता सांगण्यात येत आहे. देशातील साखरेची वार्षिक मागणी २४५ लाख टनांच्या आसपास आहे. त्यामुळे हे उत्पादन देखील मागणीच्या तुलनेत अधिक आहे. दरम्यान, राज्यात २९ मार्च अखेरीस ९३३.२६ लाख टन ऊस गाळपातून १०४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, १९५ पैकी १३२ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के इतका आहे. गेल्यावर्षी ८७२.११ लाख टन ऊस गाळपातून ९६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तर, सरासरी साखर उतारा ११.११ टक्के होता. उत्तर प्रदेशात १५ मार्च अखेरीस ८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात गेल्यावर्षी इतकी वाढ होणार नाही. तसेच, यंदा अनेक कारखान्यांनी बी हेवी मोलॅसिस आणि उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीली प्राधान्य दिले आहे. अतिरिक्त साखर उत्पादन आटोक्यात राहावे, यासाठी सरकारने देखील उपपदार्थांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देखील साखर उत्पादनात काहीशी घट होईल, असे साखर क्षेत्रातील अभ्यासकांनी सांगितले.
देशातील साखर उत्पादन ३०७ लाख टनांवर राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:53 PM
गेल्या वर्षी पेक्षा तब्बल १३ लाख टनांनी साखर उत्पादनात घट होणार आहे.
ठळक मुद्देगेल्या वर्षी देशात विक्रमी ३२० लाख टन साखर उत्पादन , महाराष्ट्रात हुमणी रोगाचा झालेला प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे साखर उत्पादन घटण्याची शक्यता देशातील साखरेची वार्षिक मागणी २४५ लाख टनांच्या आसपास