मुंबई : राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. मात्र, पूर्वीची ७० लाख मेट्रिक टन साखर पडून असल्याने साखरेची टंचाई भासणार नसल्याचे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी साांगितले. २२ नोव्हेंबरपासून साखरेचा गाळप हंगाम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यातील साखर उत्पादनाबाबत बैठक बोलाविली होती. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह साखर उत्पादकांनी या बैठकीस हजेरी लावली. यानंतर, पत्रकारांशी बोलताना गायकवाड म्हणाले की, राज्यात यंदा ५८.२८ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण १०७ लाख मेट्रिक टन इतके होते. त्यामुळे यंदा ५० टक्के साखरेचे उत्पादन घटणार आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात एफआरपी देण्यात आला. अडचणीत असलेल्या केवळ ९ कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर दिले नाहीत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
यंदा साखरेचे उत्पादन निम्म्यावर; गाळप हंगाम २२ नोव्हेंबरपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 2:54 AM