Maharashtra Agriculture: महाराष्ट्रातील गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय आज मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली. यावेळी, राज्यातील कोणत्याही कारखान्याने १५ आक्टोबरपूर्वी कारखाने सुरू करु नयेत, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले.
सन २०२२-२३ या गाळप हंगामात ऊस लागवड क्षेत्र १४.८७ लाख हेक्टर आहे. त्यामुळे या हंगामात अपेक्षित ऊस गाळप १,४४३ लाख मेट्रिक टन आहे. तर हंगामात गाळप सुरू होणाऱ्या कारखान्यांची संख्या २०३ इतकी आहे. मागील म्हणजेच २०२१-२२ या हंगामात शेतकऱ्यांना अदा केलेली FRP ची रक्कम ४२,३५० कोटी रूपये इतकी होती. सन २०२१-२२ मधील गाळप हंगामाचे उत्कट नियोजन करून संपूर्ण गाळप केल्याबद्दल तसेच या हंगामातील शेतकऱ्यांची सुमारे ९८.० टक्के FRP अदा केल्याबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे मंत्री समितीच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले.