लोणी (जि. अहमदनगर) : सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या समस्यांबाबत राज्य सहकारी संघ बघ्याची भूमिका घेत आहे़ राज्य सरकारच्या दबावाखाली साखर संघही काम करत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. साखर संघाला आता पूर्वीचे वैभव राहिलेले नाही. संघाचे धोरण सहकाराला मारक ठरत असल्याची टीका त्यांनी केली़ पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार विरोधी धोरणावर त्यांनी टीका केली. बाळासाहेब विखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या पाण्याच्या लढाईला खऱ्या अर्थाने यश आले आहे. हतबल होऊन बसलो असतो तर हक्काचे पाणी गेले असते. न्यायालयाच्या निर्णयामुळे पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे अनेक वर्षांच्या मागणीला मूर्त स्वरुप मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.तीन वर्षांचा दुष्काळ आणि समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवस्था उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)
‘साखर संघाचे धोरण सहकाराला मारक’
By admin | Published: September 25, 2016 2:19 AM