ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या अहमदाबाद - मुंबई आणि मुंबई - कोच्ची विमानात आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरी उड्डाण सुरक्षा विभागाला निनावी पत्राद्वारे हा इशारा देण्यात आला असून या इशा-यानंतर मुंबई, अहमदाबाद आणि कोच्ची विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
नागरी उड्डाण सुरक्षा विभागाला नुकतेच निनावी पत्र मिळाले आहे. 'शुक्रवारी रात्री अहमदाबादहून मुंबईत येणा-या आणि शनिवारी पहाटे मुंबईहून कोच्चीला जाणा-या एअर इंडियाच्या विमानात दहशतवादी आत्मघाती हल्ला करणार आहेत' असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. या पत्रानंतर मुंबई, कोच्ची व अहमदाबाद येथील विमानतळांवर हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जात आहे. आपातकालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.