- वैभव बाबरेकर, अमरावतीकेंद्र शासनाचा ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय एका शेतकऱ्याच्या जीवावर बेतला. शंभर आणि त्याखालील नोटांअभावी मजुरांचा चुकारा करता न आल्याने त्यांनी दिलेली दुषणे जिव्हारी लागल्याने अस्वस्थ झालेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केला. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे हा प्रकार घडला. संजय ज्ञानेश्वर खातदेव (४५) असे मृताचे नाव आहे.संजय खातदेव यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी संत्रा व कपाशीची लागवड केली आहे. यासाठी त्यांच्याकडे दररोज १० ते १२ मजूर काम करीत करतात. ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या दिवशी मजुरांचा चुकारा केला जातो. अंबाडा येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे त्यांना शनिवारी त्या १० ते १२ मजुरांची मजुरी द्यावयाची होती. शुक्रवारी सकाळी ते बँकेत गेले व स्लिप भरून रांगेत उभे राहिले. मात्र, रांगेत उभे असताना बँकेतून केवळ चार हजारच मिळणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. चार हजारांत त्यांचे काम होणार नव्हते. सुमारे तीन ते चार तास रांगेत उभे राहून त्यांना ती रक्कमही मिळाली नाही. नंतर त्यांनी एका नातेवाईकाकडे शंभर रुपयांच्या नोटांसाठी शब्द टाकला. परंतु त्यांच्याकडेही चलन नव्हते. दुसरीकडे मजुरांचा रेटा वाढला. आपले मजुरीवर पोट आहे. काहीही करा, पण आमची मजुरी द्या,अशी विनवणी मजुरांनी केली. त्यामुळे हतबल झालेल्या खातदेव यांनी कीटकनाशक घेऊन जीवनयात्रा संपविली. शहर कोतवाली पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे. तर खातदेव यांच्यावर ५० हजारांचे बँकेचे कर्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरू असताना पुढील चौकशी करणे शक्य झाले नाही, अशी असे तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मजुरांना द्यायचे होते पैसेसंजय यांना १० ते १२ मजुरांचे पैसे चुकवायचे होते. बँकेत चारच हजाररुपये मिळणार होते. मजूर मोबाईलवर पैशांची मागणी करीत होते. सारेचअसह्य झाल्याने त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. - प्रफुल्ल लोखंडे, मृताचा मेव्हणा, अंबाडा
नोटांच्या त्रासाने कंटाळून आत्महत्या
By admin | Published: November 13, 2016 2:54 AM