मुंबई : ‘टाटा मोटर्स’चे माजी उपमहाव्यवस्थापक प्रशांत सिबल (४३) यांनी शुक्रवारी काळाचौकी परिसरातील राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. त्यांनी एप्रिलमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. महिन्याभरापूर्वी ‘टाटा फायनान्स’चे माजी वरिष्ठ अधिकारी दिलीप पेंडसे यांनी आत्महत्या केली होती.प्रशांत सिबल हे ‘कल्पतरू हॅबिटॅट’ या इमारतीत राहत होते. सिबल यांनी इमारतीवरून उडी मारल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी सिबल यांना केईएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळवरून पोलिसांना सिबल यांची चिठ्ठी मिळाली आहे. त्यात त्यांनी कुटुंबियांची माफी मागत तणावातून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. संपत्तीबाबतही सूचनाही दिल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ‘टाटा मोटर्स’ने प्रशांत सिबल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. एप्रिलमध्ये सिबल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. संबंधितांना तपासासाठी पूर्ण सहकार्य करू, असे ‘टाटा मोटर्स’च्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले आहे.
‘टाटा मोटर्स’च्या माजी अधिका-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:59 AM