विवेक चांदूरकर,
वाशीम- तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देत, दोन मुलींचे हात पिवळे केले. आता तिसऱ्या मुलीच्या विवाहासाठीही तयारी सुरू केली खरी; पण अवघ्या आठ दिवसांवर लग्नकार्य येऊन ठेपले असताना हाती पुरेसा पैसा नाही. काय करावं, पैसा कुठून आणावा, या चिंतेने ग्रासलेल्या वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले.रिसोड तालुक्यातील धोडप येथील शेतकरी बबनराव शंकर बोडखे यांच्याकडे केवळ दोन एकर शेती होती. तीन मुली, एक मुलगा आणि पत्नी, असे हे कुटुंब शेतीमध्ये राबून संसार चालवित होते. त्यांनी दोन मुलींचे लग्न केले. मुलगा गणेश नववीत शिकत आहे. त्यांची तिसरी मुलगी निकिता हिचा विवाह कोयाळी खुर्द येथील गोपाळ सिरसाट यांच्याशी जमला. ७ मे रोजी लग्न ठरले. लग्नाची तयारी झाली. कपडे घेतले, पत्रिकाही छापल्या; मात्र काही दिवसांपासून बबनराव यांना पैशांची चिंता सतावत होती. तीन वर्षांपासून वऱ्हाडावर निसर्ग कोपला आहे. त्यामुळे पुरेसे पीक आले नाही. बबनराव यांनी २०१० मध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे१८ हजार रूपये कर्ज घेतले होते.दूध व्यवसायासाठी २००८ मध्ये त्यांनी ५० हजार रूपये कर्ज घेतले होते. त्यातून व्यवसाय सुरू केला;मात्र म्हशीचा मृत्यू झाल्याने तो व्यवसायही बंद पडला. त्यामुळेत्यांना शेतीवरच अवलंबून राहावे लागले. बुधवारी रात्री शौचालयास जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर शेतातील झाडाला गळफास घेतल्याचे आढळले.