लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्यापारात होणाऱ्या नुकसानाला कंटाळून एका व्यापाऱ्याने राहत्या इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून खाली उडी मारली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.मनीष खुबीचंद मेहता (५४), असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. जे कांदिवली (पूर्व) लोखंडवालातील आॅक्टाक्रेस्ट सोसायटीत एफ विंगमध्ये सतराव्या मजल्यावर पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. कपड्याचा व्यापार करणाऱ्या मेहता यांना गेल्या काही दिवसांपासून व्यापारात बरेच नुकसान होत होते. त्यामुळे ते तणावात होते. बुधवारी रात्रीदेखील जेवणाच्या टेबलावर बसल्यावर त्यांनी याबाबत बायको आणि मुलांना सांगितले होते. गुरुवारी सकाळी त्यांची मुले कॉलेजला निघून गेली. तर पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती. तेव्हा मेहता यांनी त्यांच्या बेडरूममध्ये जात खिडकीतून खाली उडी मारली. तेव्हा ते थेट जाऊन पार्किंगमध्ये जाऊन पडले. याचा आवाज शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरने ऐकला आणि त्यांनी खाली वाकून पाहिले. तितक्यात मेहता यांच्या पत्नी त्यांना बेडरूममध्ये शोधायला गेल्या. तेव्हा त्यांनीदेखील खाली वाकून पाहिले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा नवरा त्यांना दिसला, जे पाहून त्यांना धक्काच बसला, धावत त्या खाली उतरल्या. इतक्यात स्थानिकांनी याबाबत समतानगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे मेहता यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
सतऱ्याव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By admin | Published: July 14, 2017 2:38 AM