शिक्षकाचे नैराश्यातून कृत्य : नियुक्ती रद्द झाल्याने उचलले पाऊल
नांदेड : नियुक्तीचे आदेश रद्द झाल्याने बेरोजगार झालेल्या हताश अंशकालीन कला शिक्षकाने त्यासाठी थेट शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरीत आत्महत्येचा मार्ग निवडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली़ सय्यद रमिजोद्दीन (24) असे या शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आह़े मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिव आश्विनी भिडे यांना जबाबदार धरल़े या दोघांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्याच्या आवारातच नातेवाइकांनी मृतदेहासह दोन तास ठिय्या दिला़ त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. 2क्12-13 मध्ये सय्यद यांची अंशकालीन कला शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती़ पुढे अंशकालीन शिक्षक हे केंद्र शासनाच्या योजनेनुसार नेमण्यात आले होत़े त्यांचे नियुक्तीचे आदेश रद्द झाल्याने गुरुवारी रात्री त्यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़
याबाबत शिक्षण विभागाच्या सचिव आश्विनी भिडे म्हणाल्या, सदर शिक्षक पालिकेच्या शाळेत पार्ट टाइम म्हणून कामास होता. या नियुक्त्या राइट टू एज्युकेशनअंतर्गत केल्या गेल्या होत्या. त्या नियमाप्रमाणो भरल्या गेल्या नाहीत म्हणून रद्दही झाल्या होत्या. सरकारने नव्याने पोस्ट तयार केल्या आहेत़ मात्र आम्हालाच घ्या, म्हणून काही जण न्यायालयात गेले आहेत़ नगरपालिकेच्या शिक्षकांचा तसा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे याची माहिती मला देता येणार नाही. (प्रतिनिधी)
सरकार काहीही करू शकत नव्हते
दोन वर्षापूर्वी सदर शिक्षकाला नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. पदनिर्मिती न करता ही भरती झालेली होती. प्रकरण उच्च न्यायालयात गेलेले आहे. तेथे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्यात सरकार काहीही करु शकत नव्हते. मात्र अशी आत्महत्या करणो वाईट आहे, दु:खद आहे. न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री