जमीर काझी, मुंबईवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करून, आत्महत्येचा इशारा देणाऱ्या अमरावती पोलीस परिमंडळांचे विशेष महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या, असे एका परिपत्रकातून समोर आले आहे. कर्जबाजारी, व्यसनाधीन असणाऱ्या बळीराजाचे समुपदेशन करून त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी त्यांनी परिक्षेत्रातील चार पोलीस अधीक्षकांवर सोपविली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांत ते स्वत:च आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आल्याने पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.राज्य पोलीस दलाच्या प्रमुखाला थेट मेसेज पाठवून आत्महत्येचा इशारा देण्याइतपत त्यांचे मनोबल का ढळले? वरिष्ठांचा दबाव व हेटाळणीमागील कारणाची पूर्तता होणार का, असा सवाल पोलीस वर्तुळात विशेषत: मपोसे अधिकाऱ्यांमधून विचारला जात आहे. विठ्ठल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबाबत ‘कम्युनिटी पोलिसिंग’मार्फत आपल्या आदेशानिशी काढलेले अतितत्काळ परिपत्रक सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले आहे.अमरावती परिमंडळांतर्गत अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या पोलीस घटकांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विठ्ठल जाधव यांनी चारही पोलीस प्रमुखांसाठी उपाययोजना राबविण्यासाठी परिपत्रक काढले होते. त्यात नमूद केले होते की, पोलिसांनी अधिकाधिक शेतकरी मित्र तयार करावेत, त्यासाठी पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल, तलाठी यांची गावभेट घ्यावी. कर्जबाजारी शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. मद्यपी शेतकऱ्यांची ‘एनजीओ’मार्फत भेट घेऊन समुपदेशन करावे. बँक अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भात योग्य त्या कारवाईसाठी विनंती करावी. ज्या कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या घरी लग्नाच्या मुली आहेत, त्यांच्या लग्नाकरिता सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, पोलीस मित्र, यांच्यामार्फत सामुदायिक विवाह सोहळा घडवून आणावा, अशा अनेक सूचना त्यात होत्या.
आत्महत्या रोखणारा अधिकारीच हतबल?
By admin | Published: November 09, 2016 5:34 AM