गणेश वाघ
भुसावळ, दि. 17 - कुटुंबातील किरकोळ वादातून माय-लेकींनी रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली़ या घटनेत साडेतीन वर्षांची चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली आहे़. मनीषा लक्ष्मण गवळे (वय ३५) व दिव्या लक्ष्मण गवळे (१८) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत तर साडेतीन वर्षीय प्राची या अपघातात आश्चर्यकारक बचावली असून तिच्या केवळ डोक्याला मार लागला आहे़ या घटनेने भुसावळ शहरवासी सुन्न झाले आहेत़. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गवळे कुटुंब शहरातील भिरूड कॉलनीत वास्तव्यास आहेत़ लक्ष्मण गवळे यांचा पत्नीशी रविवारी सकाळी किरकोळ वाद झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले़ त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मनीषा गवळे या दोन्ही मुली दिव्या व प्राची यांना घेऊन घरातून निघाल्या़ रात्री उशिरापर्यंत त्या घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी रात्री शहर व बाजारपेठ पोलिसात धाव घेतली मात्र याचवेळी रेल्वे उड्डाणपुलाखाली दोन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी खातरजमा केली असता या बाबीचा उलगडा झाला़ रात्री १२ वाजेच्या सुमारास या सर्व घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथे रवाना केले़
तिसरी मुलगी बचावलीगवंडी काम करणाऱ्या लक्ष्मण गवळे यांना तीन मुली आहेत़ दोन नंबरची मुलगी पायल (१५) ही आत्याकडे नागपूर येथे गेल्याने ती सुदैवाने बचावली़ भिरूड कॉलनीत शोककळा या घटनेनंतर भिरूड कॉलनीत शोककळा पसरली़ अनेक महिलांनी असे घडलेच कसे, असे सांगत घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले तर सायंकाळी मनीषा यांनी साडीची उधारी चुकवल्याची माहितीदेखील मिळाली़शहर पोलिसांची धाव या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंगद नेमाणे, हवालदार वसंत लिंगायत, चालक जमील शेख, नितीन चव्हाण, प्रशांत जाधव यांनी धाव घेत पंचनामा केला़साडेतीन वर्षाची चिमुरडली बचावलीमाय-लेकींसह आत्महत्या करण्याच्या घटनेत साडेतीन वर्षाची प्राची आश्चर्य कारकरित्या बचावली आहे़ तिच्या डोक्याला मार लागला असून खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे़ अप-डाऊन लाईनवर आढळले मृतदेहसुरुवातीला दिव्या गवळी (१८) या तरुणीने अप लाईनवर कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली झोकून दिल्याने तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले तर मुलीच्या मृत्यूनंतर मनीषा गवळे यांनीही डाऊन लाईनवर रेल्वेखाली झोकून दिले़ त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर साडेतीन वर्षाची प्राची डोक्याला मार लागल्याने बचावली़ अप लाईनवरील मृतदेहाबाबत बाजारपेठ पोलिसात तर डाऊन लाईन मृतदेह शहर हद्दीत आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़