धामणगाव रेल्वे (जि़ अमरावती)/ लातूर : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून अमरावती आणि लातूर जिल्ह्णात प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे गुरुवारी उघडकीस आले़ अमरावतीच्या धामगाव तालुक्यातील झाडगाव येथे संजय पुंडलिक काळे (२८) याने बुधवारी रात्री घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यंदा शेतात काहीच उत्पन्न झाले नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले़ त्याच्यावर दोन लाख रूपयांचे कर्ज आहे़ जुना धामणगाव येथे किशोर नामदेव कांबळे (५२) यांनी समाज मंदिरासमोर बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. पाच एकर शेतीला यंदा निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसला. यातच त्यांच्यावर बँकेचे तीन लाख रूपयांचे कर्ज होते़ लातूरच्या चाकूर तालुक्यातील सुगाव शिवारात सूर्यकांत गणपतराव मोरे (४०) यांनी गुरुवारी सकाळी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. सूर्यकांत यांच्या आजोबाच्या नावावर दीड एकर शेती आहे. परंतु, त्यावर कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने सर्व कुटुंब रोजंदारीने काम करीत असे. यंदा नापिकी झाल्याने शेतीतून उत्पन्न निघाले नाही़ सूर्यकांत यांच्या आजोबाच्या नावावरील अडीच लाखांचे कर्ज फेडावे कसे, या विवंचनेतून ते वैफल्यग्रस्त बनले होते़ दुसरी घटना औसा तालुक्यातील बोरफळ येथील असून, गोविंद तुकाराम वाघमारे (४०) यांनी मागील वर्षी हातउसने पैसे घेऊन बोअर घेतला़ त्याला पाणीही चांगले लागले म्हणून ऊसही लावला़ पण अचानक बोरचे पाणी गेले़ त्यामुळे हातउसने घेतलेले पैसे परत कसे करायचे, बँकेचे ६० हजार रूपये कसे फेडायचे, या विवंचनेत ते सापडले़ यातूनच त्यांनी गुरुवारी सकाळी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ (प्रतिनिधी)
राज्यात चार शेतक-यांची कर्जामुळे आत्महत्या
By admin | Published: January 16, 2015 5:44 AM