ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. २ - लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथे मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या १८ जणांसह जिल्ह्यात इतरत्र पुरात अडकलेल्यांची सुखरूप सूटका करण्यात अखेरीस स्थानिक मदत पथकांना यश आले आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे लिबोंटी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु झाल्याने सुमारे २४ जण अडकले होते. त्यापैकी सहा जणांची मदत पथकाने रात्री पहिल्या टप्प्यात सुखरूप सुटका केली. त्यानंतरही सुरु राहिलेल्या प्रयत्नात अन्य सतरा जणांचीही रात्री उशिरा सूटका करण्यात यश मिळाल्याचे स्थानिक मदत पथकांच्या सुत्रांनी सांगितले.
लिंबोटी धरणातून पाण्याचा विसर्गही कमी झाल्यामुळे, आणि स्थानिक आपत्ती निवारण पथकांनी रात्रीच्या प्रहरातही शिताफी आणि मोठ्या धाडसाने पुरातअडकलेल्यांपर्यत पोहचण्याचाप्रयत्न केला. त्याला यश आल्यामुळे अनेकांना सुखरूपपणे पुरातून बाहेर काढता आल्याचे जिल्हाधिकारी सुरे श काकाणी यांनी सांगितले.यासाठी त्यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण पथक तसेचअग्निशमन दलाचे प्रमुख रईस पाशा, तसेच लोह्याचा कंधारच्या तहसिलदार अरुणा संगेवार,लोह्याच्यातहसिलदार उषाकिरण श्रृंगारे तसेच त्यांच्यासह विविध पातळ्यावर पुर नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्यां यंत्रणांतील अधिकारी,कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक, स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आहे. परिस्थिती धीराने आणि संयमाना हाताळणाऱ्या डोंगरगावच्या स्थानिकांचेही त्यांनी कौतूक केले आहे.
तत्पुर्वी मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील कुंद्राळा तलावाच्या पाण्यात अडकलेल्या मारूती सोनपल्ले या पंचवर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करण्यातही स्थानिक मदत पथकाला यश मिळाले होते.
संभाव्य परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राष्टीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) दलाला पाचारण करण्यात आले असून, हे दल थेट डोंगरगाव येथे पोहचणार होते. आवश्यकता भासल्यास या दलातील पथके अन्य ठिकाणीही पोहचतील यासाठी रात्री उशिरापर्यंत समन्वयन करण्यात येत होते.
लोहा तहसीलकार्यालय,कंधारतहसील कार्यालयासह , महापालिकेच्या आपत्ती निवारण पथकाने मदत व सुटकेसाठी प्रयत्न केले. डोंगरगावातील मदत व सुटकेच्या या कार्याच्या आणखी सहाय्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह एक पथकही रवाना करण्यात आले. हे पथकही रात्री डोंगरगाव येथे पोहचले.
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्हा मुख्यालयातून मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थान कक्षातूनच पुरात अडकलेल्यांना व त्यांच्या नातेवाईकांना धीर दिला. तसेच विविध प्रकारची मदत आणि सुटकेसाठीचे साहित्य तसेच साधनसामुग्री वेळेत पोहचेल यासाठी समन्वय केले. राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील विविध यंत्रणांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनीही समन्वयन केले.
दरम्यान,जिल्ह्यात अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा सज्ज झाले असून, नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी काकाणी यांनी केले आहे. डोंगरगाव येथील परिस्थिती पुर्ण नियंत्रणात असल्याचेही त्यांनी सांगितले. लिंबोटीसह जिल्ह्यातील सर्व धरण, प्रकल्प सुरक्षीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
तसेच सतर्कता म्हणून नदी काठच्या गावांनी आणि सखल भागातील रहिवाशांनी संततधार पावसाच्या अनुषंगाने सतर्क रहावे असेही आवाहनही करण्यात आले आहे.