मुंबई : वरिष्ठांकडून होत असलेले मानसिक अत्याचार, तसेच धमक्यांना कंटाळून दूरसंचार विभागातील सहायक महासंचालक संजीव राजोरिया (३७), यांनी बुधवारी आत्महत्या केल्याची घटना पवईत घडली. याप्रकरणी राजोरिया यांच्या पत्नीने वरिष्ठांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिस (आयईएस)मध्ये अधिकारी असलेले संजीव हे पवईच्या बीएसएनएल कॉलनीत पत्नी आणि दोन मुलांसोबत राहायचे. त्यांनी १२ वर्षे एमटीएनएलमध्ये नोकरी केली. गेल्या पाच वर्षांपासून ते दूरसंचार विभागात सहायक महासंचालक म्हणून कार्यरत होते. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास पवईच्या ओयो लॉजमध्ये त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ओयो लॉजच्या ११व्या मजल्यावरील खोली क्रमांक १०६मध्ये ते थांबले होते. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच, पवई पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली.पत्नी नीलम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, राजोरिया यांच्यावर त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठांकडून अत्याचार सुरू होता. कार्यालयातील एका महिला कर्मचाºयाचे लैंगिक शोषण करता यावे, यासाठी त्यांच्यावर दबाब आणला जात होता. त्यामुळे ते तणावाखाली होते. कार्यालयातील अधिकारी प्रिजेश कुमार, अरविंद कुमार, सुबोध सक्सेना आणि हौसला प्रसाद यांच्याविरुद्ध त्यांनी वरिष्ठांकडे वारंवार तक्रार केली होती. तरीदेखील दुर्लक्ष करण्यात आले. मानसिक तणावामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ते आठवडाभर सुटीवर होते. कामावर रुजू होऊन दोन दिवस होत नाही तोच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला कार्यालयातील वरिष्ठ जबाबदार असल्याने त्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नीलम यांनी केली आहे. या तक्रारीवरून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.कुटुंबीयांनीही घेतली होती वरिष्ठांची भेट -राजोरिया यांना मार्च महिन्यांपासून वरिष्ठांनी टार्गेट केल्यानंतर त्यांनी याबाबत पत्नीला सांगितले. त्यानंतर त्यांच्या सासºयांनी विभागप्रमुखांची भेट घेऊन याकडे लक्ष देण्यास सांगितले. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. २१ जुलै रोजी यासंदर्भात त्यांची बैठक झाली. मात्र, काही तोडगा निघाला नाही. जर विभागप्रमुखांनी याची दखल घेतली असती तर ते वाचले असते, असे राजोरिया यांची पत्नी नीलम यांचे म्हणने आहे.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अधिका-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 4:11 AM