आॅनलाइन लोकमतसातारा, दि. 2 - कऱ्हाड/कुसूर येथे कर्जाला कंटाळल्याने मी नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत आहे, असा मेसेज मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवून युवकाने खरोखरच नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. अंबवडे-कोळेवाडी, ता. कऱ्हाड येथे गुरुवारी दुपारी ही घटना घडली. याबाबतची नोंद रात्री उशिरा कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. पवन अण्णासाहेब कोळेकर (वय २८, रा. कोळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोळेवाडी येथे पवन कोळेकर हा आईसमवेत राहत होता. सध्या तो आगाशिवनगर येथील एका खासगी कंपनीत कामास होता. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्येत असल्याचे आई व मित्रांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी त्याबाबत त्याच्याकडे विचारणाही केली होती. मात्र, पवनने कोणास काहीही सांगितले नाही. दरम्यान, गुरुवारी सकाळी पवनने काही मित्रांना व्हॉट्सअॅपर एक मेसेज पाठविला. कर्जाला कंटाळून मी नदीत उडी घेऊन आत्महत्या करीत असल्याचे व या सर्वाला मी स्वत: जबाबदार असल्याचे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते.पवनचा हा मेसेज आल्यानंतर मित्रांना धक्का बसला. काहींनी तातडीने त्याच्या मोबाईलला फोन केला. मात्र, मोबाईल बंद होता. त्यानंतर मित्रांनी एकमेकांना फोन करून बोलावून घेतले. सर्वजण वांग नदीपात्राकडे धावले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी वांग नदीकडेला कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पवनची चप्पल व पाकीट आढळून आले. पवनने नदीत उडी घेतल्याची खात्री झाल्यानंतर मित्रांनी याबाबतची माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस व ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. काही युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन शोध घेतला. मात्र, पवन आढळून आला नाही. अखेर कऱ्हाडातील काही पाणबुडींना बोलविण्यात आले. पाणबुडींनी शोध घेतल्यानंतर पवनचा मृतदेह आढळून आला. याबाबत आकाश राजेंद्र सावंत याने कऱ्हाड तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.पोलिसांकडून कसून चौकशीकर्जाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे पवनने मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्याच्यावर कसले कर्ज आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. पैशांसाठी कोणी पवनला त्रास देत होते का, तसेच त्याने खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते का, याचाही पोलीस तपास करीत आहेत. त्याअनुषंगाने काही जणांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.
मित्रांना व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून युवकाची आत्महत्या !
By admin | Published: February 02, 2017 9:42 PM