ऑनलाइन लोकमत
रेणापूर, दि. 1 - कर्जबाजारीपणामुळे चिंतातूर झालेल्या दोन शेतक-यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
सदाशिव एकनाथ माने (६०, रा़ ब्रम्हवाडी, ता़ रेणापूर) व इंद्रजित ज्ञानोबा तांदळे (४१, रा़ कोळवाडी, ता़ अहमदपूर) असे आत्महत्या केलेल्या शेतक-यांची नावे आहेत. ब्रम्हवाडी येथील शेतकरी सदाशिव माने यांना ३० गुंठे शेती आहे त्यावर व मजुरी करुन त्यांचा उदरनिर्वाह होत असे. त्यांनी आपल्या तीन मुलींच्या विवाहासाठी खाजगी कर्ज घेतले आहे. या कर्जाच्या परतफेडीपोटी त्यांनी २० गुंठे जमीन विक्री केली.
त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता त्यांना भेडसावत होती. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे शेताकडे झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी शेतातील शेडमधील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, शनिवारी सकाळी त्यांची पत्नी सुशीला माने ह्या शेताकडे गेल्या असता त्यांना आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे.
दुसरी घटना अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी येथील आहे़ कोळवाडी येथील इंद्रजित ज्ञानोबा तांदळे (४१) यांच्या वडिलांच्या नावे १ हेक्टर ४८ आर शेतजमीन आहे. त्यांच्या वडिलांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सहा हजार रुपयांचे कर्ज आहे तसेच इंद्रजित तांदळे यांच्यावर खाजगी कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
या कर्जामुळे इंद्रजित तांदळे यांनी शुक्रवारी मध्यरात्री स्वत:च्या घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी किनगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.