नाशिक : केंद्र व राज्य सरकारकडून कर्जमाफी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण वाढले असून, सिन्नर तालुक्यात दोघा शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येनंतर बुधवारी मालेगाव तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. नवीन वर्षापासून जिल्ह्यात चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या असून, त्यातील सहा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महादू कारभारी पवार (५५) रा. सौंदाणे व जगन विठ्ठल अहिरे (५०) रा. डोंगरगाव असे या दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. राहत्या घरातच या दोघांनी विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपविल्याचा प्राथमिक अहवाल मालेगाव तहसील कार्यालयाने कळविला आहे. दोन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील शिवाजी बोडके रा. सोनगिरी व अरुण सोनकांबळे रा. शिवडे या दोन्ही शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्त्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येने जिल्ह्यात आत्महत्त्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडून कर्जमाफी होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होते. परंतु राज्याच्या व केंद्राच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद ठेवलेली नसल्याने शेतकरी वर्ग निराश झाला व त्यातून आत्महत्त्येच्या घटना वाढल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मालेगाव तालुक्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या
By admin | Published: March 23, 2017 10:44 PM