मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताचं, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणतेही संधी नेतेमंडळी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे . वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. औरंगाबाद शहरातील साधा कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नसलेली शिवसेना राममंदिर काय बांधणार अश्या शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
अयोध्यातील राममंदिर बांधण्याच्या मुद्यावरून शिवसेना नेहमीच आक्रमक होताना पाहायाला मिळाली. मात्र याच राममंदिरावरून सुजात आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, शिवसनेचे नेतेमंडळी राममंदिर बांधू असे सांगत फिरतात. मात्र ज्यांना औरंगाबाद सारख्या शहरातील कचराच्या प्रश्न सोडवता आला नाही, ते काय राममंदिर बांधणार. अशा शब्दात त्यांनी सेनेवर जहरी टीका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप-शिवसेना हे बहुजन समाजातील तरुणांची डोके भडकवून त्यांना राममंदिर सारख्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरवत आहे. मात्र याच पक्षातील नेत्यांची मुले राममंदिराच्या प्रश्नासाठी कधीच रस्तावर उतरताना दिसत नाही. ज्या नेत्यांना जनतेचे स्थानिक प्रश्न सोडवता येत नाहीत, त्यांनी राममंदिर बांधण्याची भाषा करू नयेत असेही सुजात आंबेडकर म्हणाले.
औरंगाबाद महानगरपालिकेत कित्येक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शहरातील कचराप्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरून सुजात यांनी सेनेचा समाचार घेतला. स्थानिक प्रश्न सोडून, राममंदिरचा प्रश्न पुढे करून भाजप-शिवसेनेकडून घाणेरडे राजकरण केले जात असल्याचा आरोप सुद्धा सुजात यांनी यावेळी केला.