मुंबई - लोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण २८८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर सुद्धा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सोशल मीडियात मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. मात्र सुजात हे निवडणूक लढवणार नसल्याचे खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच स्पष्ट केले आहेत. त्यामुळे सुजात आंबेडकर निवडणूक लढवणार असल्याचे फक्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत सुजात आंबेडकर हे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याच्या पोस्ट सद्या सोशल मीडियात फिरत आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे बेलापूर किंवा वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असून, त्यांच्या विरोधात सुजात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
मात्र प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील पत्रकार परिषेदत बोलताना खुलासा केला होता की, माझ्या कुटुंबांतून कुणीच विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत. तसेच विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी सुजात यांचे वय बसत नाही. तर मी विधानसभा निवडणूक कधीच लढवत नसल्याचे सुद्धा ते म्हणाले. त्यामुळे सुजात आंबेडकर हे निवडणुक लढवणार असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहेत.