Exclusive: सुजयचं 'हे' वाक्य ऐकून राधाकृष्ण विखे निरुत्तर झाले!
By यदू जोशी | Published: March 11, 2019 05:21 AM2019-03-11T05:21:01+5:302019-03-11T13:26:34+5:30
मी स्वत: काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले.
- यदु जोशी
मुंबई : ‘मी सुजयला समजावले पण स्वत:च्या राजकीय भवितव्यासाठी त्याने त्याचा निर्णय घेतला. मी स्वत: काँग्रेसमध्येच राहणार आहे’, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लोकमतशी बोलताना सांगितले.
‘मी सुजयशी भरपूर चर्चा केली. काँग्रेसतर्फे अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची त्याची तीव्र इच्छा होती. राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा आम्ही सर्वपरीने मागून बघितली पण त्यांनी तो सोडली नाही. सुजय मला म्हणाला, ‘तुम्ही विरोधी पक्षनेते असताना एक जागा आपल्या कुटुंबाला मिळवून घेता येत नसेल तर मग मी वेगळा निर्णय घेतो.त्याने असे म्हटल्यावर माझा नाइलाज झाला’, असे विखे म्हणाले.
‘सुजय काही विशीतला तरुण नाही. तो आता ३७ वर्षांचा आहे. न्युरोसर्जन आहे. त्याला राजकीय क्षेत्रात करिअर करावेसे वाटते. आता नाही तर कधी निर्णय घ्यायचा हा त्याचा सवाल आहे. त्याने माझे ऐकले नाही. मी माझ्यापुरते मात्र स्पष्टपणे सांगू शकतो की मी भाजपात जाणार नाही. मला तशी ऑफरदेखील कोणी दिलेली नाही. मी विरोधी पक्षनेता आहे आणि पक्षाच्या विजयासाठीच प्रयत्न करेन, असे विखे म्हणाले.
उद्या भाजपा प्रवेश
डॉ. सुजय विखे हे १२ मार्चला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेणार आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दुपारी हा कार्यक्रम होईल. येत्या दोन दिवसात काँग्रेस वा राष्ट्रवादीने कुठलीही समजूत काढली तरी सुजय हे भाजपा प्रवेशाचा निर्णय बदलणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ते अहमदनगरमधून भाजपाचे उमेदवार असतील हे जवळपास नक्की आहे.