मुंबई - आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सुजय विखे पाटील यांची नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्रीय संसदीय समितीकडे करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश आणि उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, '' सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. मात्र भाजपामध्ये सुजय विखे यांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे उदयास येईल. त्यामुळे पक्षानेही त्यांच्याबाबत योग्य असा निर्णय घेताना नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी देण्याचे सर्वाधिकार संसदीय समितीकडे आहेत. मात्र आमच्याकडून झालेल्या शिफारशीला मान्यता मिळेल, असा विश्वास आहे. आता नगरची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.
हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे. तसेच देशाला मोदींच देशाला विकासाच्या वाटेवर पोहोचवू शकतात, असा विश्वास इथल्या तरुणांना आहे. सुजय विखे पाटील यांनाही हेच जाणवले. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सुजय विखेंच्या प्रवेशाबाबत सर्वांशी चर्चा करून नंतरच त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला आहे. आता येत्या काळात नगर जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. सुजय विखे-पाटलांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगरच्या विखे-पाटलांची नवी पिढी आता भाजपात गेली आहे. सुजय विखे-पाटलांच्या भाजपा प्रवेशानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.