Sujit Patkar News: मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक केली आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेने मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले होते, यावेळी अनेक लोकांना पात्रता नसताना कामे देण्यात आली होती, नियम डावलून त्यांना कामे देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर आता सुजित पाटकर यांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुजित पाटकर यांच्यासोबत किशोर बिचुले यांची रवानगीही ईडी कोठडीत करण्यात आली आहे. या कारवाईत सुजित पाटकर हे लाईफ लाईन मॅनेजमेंटचे डिरेक्टर होते तर दुसरे डॉ. किशोर बिचुले बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे इंचार्ज होते. जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. या कंपनीने जे डॉक्टर आणि संबधित यंणत्रा दाखवली ती यंत्रणाच अस्तित्वात नव्हती, असा आरोप करण्यात आला आहे. सुजित पाटकर यांच्यावतीने करण्यात आलेल्या युक्तिवादात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
२०२२ मध्ये FIR, मग इतके दिवस चौकशी का नाही?
सुजित पाटकर यांना आता अटक करण्यात आली आहे. मात्र, २०२२ मध्ये यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, इतके दिवस चौकशी का केली नाही, चौकशीला इतका विलंब होण्याचे कारण काय, इतक्या दिवसांनी अटक करण्यामागे काहीतरी हेतू असू शकतो, अशी शक्यता सुजित पाटकर यांच्या वकिलांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला होता. जेवढे कॉन्ट्रक्ट या कंपन्यांना देण्यात आली आहेत. या कंपन्या काही दिवसापूर्वी सुरू केल्या आहेत. त्या कंपन्यांना अनुभव नाही, यात अनेक नियम डावलले आहे. ज्या डॉक्टरांच्या नावे बिले काढण्यात आली ते डॉक्टरही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे, या प्रकरणी आता ईडीने कारवाई केली आहे.