ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ आॅगस्ट रोजी संपन्न होणार आहे. परंतु, आधीच आॅडिट आणि या स्पर्धेवर होणाऱ्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीच्या मुद्यावरून या स्पर्धेवर टीकेची झोड उठत असतानाच या स्पर्धेला इव्हेंटचे स्वरूप देतानाच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सैराट चित्रपटातील कलाकार आणि भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या मातीतील प्रतिभावंत खेळाडू अजिंक्य रहाणे याला पाचारण करण्याचे आयोजकांनी निश्चित केले होते. या सेलिब्रिटींवर होणाऱ्या कोट्यवधींच्या उधळपट्टीबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आयोजकांनी आता यातून माघार घेतली आहे. सैराटची टीम तर या स्पर्धेत धावणार नसली तरी तरुणांच्या जीवाची धडकन असलेला सुलतान अर्थात सलमान खान या स्पर्धेला हजेरी लावणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. सातत्याने महापौर वर्षा मॅरेथॉन राबवणाऱ्या ठाणे महापालिकेला या स्पर्धेसाठी केला जाणारा खर्च पेलणे कठीण झाल्याने त्यांनी यंदाची स्पर्धा इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने या स्पर्धेसाठी ४० लाखांची तरतूद केली आहे. परंतु, दरवर्षी ती अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा या स्पर्धेला वेगळी उंची गाठून देण्यासाठी ते काहीही करण्याच्या तयारीत आले आहेत. त्यानुसार, आता शहरभर मॅरेथॉन स्पर्धेचे फलक लागले असून त्यांच्या ठिकाणी प्रायोजकांचीही नावे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवरील भार प्रायोजकांमुळे काही अंशी का होईना कमी होणार आहे. परंतु, दुसरीकडे स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा मराठी चित्रपट क्षेत्रात वेगळी उंची गाठलेल्या सैराट चित्रपटातील कलाकारांची फौज आणि भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यालादेखील पाचारण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. परंतु, रहाणेने सुमारे एक कोटीचे, तर सैराटमधील प्रत्येक कलाकाराने पाच लाखांचे मानधन मागितल्याची माहिती पुढे आली होती. आधीच या स्पर्धेला इव्हेंटचे स्वरूप देण्यात येत असल्याने या स्पर्धेचा खर्च ७५ लाखाहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात, अशा प्रकारे पुन्हा कलाकारांच्या मुखदर्शनासाठी लाखोंची उधळपट्टी कशासाठी, हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच आयोजकांनी यातून माघार घेतली आहे. (प्रतिनिधी)आता सैराट होऊन झिंगाट धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजकांनी थेट सुलतान अर्थात सलमान खान याला पाचारण करण्याचे निश्चित केले आहे. या स्पर्धेचे निमंत्रणदेखील त्याला दिले असून त्याची ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक आणि महापौर संजय मोरे यांनी नुकतीच भेट घेतली आहे. सलमानला आणण्यासाठी आयोजकांनी फाटक यांना गळ घातली असून त्यानुसार त्यानेदेखील होकार दिल्याचे बोलले जात आहे.
महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सुलतान धावणार, ‘सैराट’गिरीला चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 3:37 AM