ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 15 - पावसावर अवलंबून असलेली शेती हे अस्मानी नाही तर सुलतानीही संकट आहे. या संकटाचे आव्हान मोठे असून त्यांचा सामना करण्यास सरकार पुरेसे पडणार नाही अशावेळी समाजानेही यासाठी पुढे यायला हवे असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था पुरविण्यात आधीचे सरकार अपयशी ठरले असून येत्या काळात विकेंद्रित पाण्याचे साठे निर्माण करण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असल्याचेही ते म्हणाले. भारतीय जैन संघटनेतर्फे १००० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना वाघोली येथे ते बोलत होते. सध्या राज्यात असणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरतून ७०० विद्यार्थी तर मेळघाट व ठाणे या आदिवासी भागातील ३०० विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दहावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याबरोबरच या विद्यार्थ्यांची निवास व भोजनाचीही सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सामाजिक, अर्थिक परिवर्तनासाठी सरकार काम करतच असते. मात्र समाज हा शासन व कायद्यांच्या भरोशावर नाही तर समाजाच्या भरोशावर बदलत असते. जन्माला आलेल्या प्रत्यक व्यक्तीला जगण्याचा अधिकार असून वंचित समाजघटकांची जबाबदारी समाजातील इतर लोकांनी घ्यायला हवी. आत्महत्या होतात त्याबाबत संवेदना जागृत व्हायला हवी मात्र त्याचे उदात्तीकरण व्हायला नको असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.