- भक्ती सोमण उन्हाळ्यात गारवा देणारं मधुर आणि तितकंच आरोग्यदायी पेय म्हणजे कैरीचं पन्हं. स्वस्त आणि मस्त असं हे पेय तुम्ही घरच्या घरी उगदी काही मिनिटांतच करू शकता. पन्ह्यासोबतच लालचुटूक कोकम सरबतही उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. पाडव्यानंतर चैत्र महिना येतो. येताना उन्हाळा सुसह्य करण्याची बेगमीही देतो. बाजारात याच काळात कैऱ्या दिसायला लागतात. मग त्या कैऱ्यांचं काय काय करायचं याचे बेत तयार होतात. चैत्र महिन्यात अनेकांकडे चैत्रगौरीची पूूजा होते. तिला नैवेद्य म्हणून कैरीचं पन्हं आणि चण्याच्या डाळीत कैरी, नारळ, फोडणी घालून केलेली आंबाडाळ केली जाते. हे प्रकार कुठल्याही मोसमात आता करता येऊ शकत असले तरी ते करण्याची खरी मजा ही उन्हाळ्याच्या काळातच जास्त आहे. उकडलेल्या कैरीच्या गरात गूळ-साखर-वेलची, थोडेसे केशर घालून केलेल्या आंबटगोड चवीच्या पन्ह्याची चव काय वर्णावी! अहाहा... संपूर्ण उन्हाळा आणि त्यानंतर किती तरी दिवस या पन्ह्याची चव जिभेवर रेंगाळत मन तृप्त करते. बदल म्हणून या पन्ह्यात हिरवी मिरचीही कुटून घालता येईल. पन्हं करण्याच्या प्रांतागणिक पद्धती आहेत. महाराष्ट्रात पन्हं करताना त्यात गूळ किंवा साखरेचा उपयोग केला जातो. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब अशा प्रांतात "आम पन्हा" करताना त्यात पुदिना, जिरेपूड, सैंधव घालून केले जाते. लिंबाच्या चकत्याही घालतात. या पन्ह्याची चव वेगळी लागते. थोडक्यात प्रांत कुठलाही असला तरी कैरीचं पन्हं पिऊन उन्हाळा सुसह्य होतो हे मात्र खरे. ज्याप्रमाणे पुरणपोळी आईस्क्रीम मिळते त्याप्रमाणे कैरीच्या पन्ह्याचा आईस्क्रीममध्येही उपयोग केला जाऊ शकतो, असे शेफ तुषार देशमुख यांनी सांगितले. व्हॅनिला आईस्क्रीममध्ये ज्याप्रमाणे चॉकलेट किंवा स्टॉबेरी सिरप वापरतात त्याचप्रमाणे उकडलेल्या कैरीचा गर काढून त्यात वेलची पावडर, केशर घालून पाणी न घालता ते घट्टसरच ठेवायचं. हे पन्ह्याचं सिरप आंब्याच्या आईस्क्रीमवर घालायचं. आंब्याची गोड चव आणि कैरीचा आंबटपणा याचं कॉम्बिनेशन अफलातून लागतं, असंही तुषार यांनी सांगितलं. कैरीचा पल्प आता कुठल्याही मोसमात मिळत असला तरी मे महिन्यातल्या कैरीचा स्वाद वेगळाच नाही का?कोकम सरबत!रातांब्याचे अर्थात कोकमाचे सरबत हे आॅलटाइम हिट असं सरबत. म्हटलं तर दिसायला एवढंसं असणारं हे फळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोकमचा उपयोग रोजच्या जेवणात डाळी, भाज्यांमध्ये केला जातोच, पण त्याचे सरबत नियमित घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो. ताज्या रातांब्याचा गर काढून केलेल्या सरबताची चव अफलातून लागते. पण आता तयार मिळणाऱ्या कोकमाच्या आगळामुळे अगदी कधीही हे सरबत करता येते. आजकाल कोकम सरबत काही कॉकटेल्समध्ये बेस म्हणूनही ठेवायला लागले आहेत. याशिवाय कोकम फ्लेवरचा "आइस टी" मिळायला लागला आहे. कोकम सरबताची पारंपरिक चव तीच ठेवत त्याला आधुनिक रूप द्यायचा प्रयत्न होताना दिसत आहे.
उन्हाळ्यातील गारवा
By admin | Published: May 14, 2017 4:42 AM