पुणे : एल्गार परिषदेची चौकशी एनआयएकडे देण्यास विरोधा करणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना समन्स बजावावा, अशी मागणी एका व्यक्तीने केली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेताच केंद्र सरकारने एल्गार परिषदेचे प्रकरण एनआयएकडे सोपविले होते. यावरून राज्यातील वातावरण तापले होते. तर एनआयएच्या पथकालाही पुणे पोलिसांनी कागदपत्रे न दिल्याने माघारी जावे लागले होते. अखेर बऱ्याच वादानंतर ठाकरे यांनी एनआयएकडे एल्गार परिषदेची चौकशी देण्यास मंजुरी दिली होती. यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडताना एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव हिंसा ही दोन्ही प्रकरणे वेगळी असून भीमा कोरेगाव प्रकरण कदापीही केंद्राकडे देणार नसल्याचे सांगितले होते. हा वाद शमत नाही तोच एका व्यक्तीने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे जाऊन शरद पवारांनाच समन्स बजावण्याचा विनंती अर्ज दाखल केला आहे.
2018 मध्ये हा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची चौकशी या आयोगाकडून केली जात आहे. या विनंती अर्जाचे वृत्त एएनआयने दिले आहे.