ठाणे : सिंचन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा आरोप असलेले माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या वतीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात त्यांचे वकील प्रदीप पाटील यांनी हजेरी लावली. यापुढे तटकरेंनी स्वत: २१ सप्टेंबर रोजी हजर राहावे, असे समन्स पाटील यांच्यामार्फत बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तटकरे आणि अजित पवार या दोघांनाही आपले म्हणणे मांडण्यासाठी पाचारण केले होते. दोघांनाही त्यांच्या प्रतिनिधींमार्फत म्हणणे मांडण्याचीही संधी देण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून अॅड. पाटील यांनी त्यांची बाजू मांडली. एसीबीच्या काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. काही प्रश्नांची चौकशी अजून बाकी असल्यामुळेच त्यांनी वैयक्तिक हजेरी लावून आपले म्हणणे मांडावे, असे सांगण्यात आल्याची माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, कोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आणि कोणत्या प्रश्नांची मिळाली नाहीत, याबाबतचा तपशील देण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. (प्रतिनिधी)
तटकरेंना २१ सप्टेंबरला हजर राहण्याचे समन्स
By admin | Published: September 16, 2015 12:57 AM