लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने उघडीप घेतली असतानाच दुसरीकडे मात्र येत्या चार ते पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी अधूनमधून जोरदार सरींसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. हवामान खात्याकडील नोंदीनुसार, गुजरात ते कर्नाटक पट्ट्यालगतचा द्रोणीय पट्टा आता आता कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत पसरला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
२२ जुलै : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होईल.
२३ आणि २४ जुलै : कोकण, गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२५ जुलै : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
२३ आणि २४ जुलै रोजी पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मान्सूनचा ट्रफ अधिक उत्तरेकडे न सरकता त्याच्या मूळ सरासरीच्या जागेवरच खिळलेला राहिला. शनिवारपासून पुन्हा दक्षिणेकडे सरकण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रात मुंबईसह कोकण, गोवा व विदर्भ वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत तीन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ