ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ८ - यंदा परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतक-यांना रडकुंडीस आणले असून, ऐन काढणीवर आलेल्या सोयाबीनला परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पावसातच सोयाबीन काढले आहे. आता हे सोयाबीन वाचविण्यासाठी आणि सुकविण्यासाठी शेतक-यांची चांगलीच कसरत होत असल्याचे दिसते. चातक ज्याप्रमाणे आपली चोच वर करून पावसाच्या थेंबाची प्रतिक्षा करतो, त्याचप्रमाणे सोयाबीन शेतकरी वाटेल त्या मोकळ्या जागेवर सोयाबीन पसरवून सूर्य आकाशात दिसण्याची प्रतिक्षा करीत आहेत.
मागील तीन वर्षांत सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अवषर्णाचा मोठा फटका बसला आणि या तीन वर्षांच्या कालावधित सोयाबीनचे उत्पादन जवळपास ६० टक्के घटले. काही शेतकºयांना, तर सोयाबीन काढणेही परवडले नाही. आता यंदा पावसाने सुरूवातीचे दोन महिने चांगली साथ दिल्याने मागील तिनही वर्षांची कसर पूर्ण होते की काय, असा विश्वास वाटू लागला होता; परंतु तो फोल ठरला. सोयाबीन शेंगा, फुलावर असताना पावसाने दडी मारल्यामुळे कित्येकांना आपले हिरवेगार सोयाबीन उन्हाच्या तडाख्यात सुकताना पाहूनही काहीच करता आले नाही. पश्चित व-हाडात यामुळे जवळपास ४० टक्के सोयाबीन शेंगा धरण्यापूर्वीच सुकले, त्यानंतर पावसाने हजेरीइलावून पुन्हा एकदा उर्वरित सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळे सोयाबीन पुन्हा बहरले; परंतु हे पिक काढणीवर आले असतानाच परतीच्या पावसाने रेकॉड ब्रेक कामगिरी करतान १० दिवस ठाणच मांडले. यामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला. काही शेतकºयांनी, तर रिमझीम पावसातच सोयाबीनची काढणी केली; परंतु काढलेले सोयाबीन आधीच ओलसर आणि त्यात वातावरणही पावसाळी. मग हे सोयाबीन पुन्हा खराब होण्याची भिती असल्याने शेतकरी अगदी घाणसाण जागेतही हे सोयाबीन पसरून सूर्य आकाशात तळपण्याची प्रतिक्षा करीत आहेत. हे सोयाबीन सुकावे म्हणून शेतकºयांची चिमुकली मुलेही पसरविलेले सोयाबीन वरचे खाली आणि खालचे वर करीत पित्याला मदत करीत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसले.