नागपूर : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या संकटामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत २६ एप्रिलला (रविवार) संघ स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. ‘वर्तमान स्थिती आणि आमची भूमिका,’ या विषयावर ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. विशेष म्हणजे हे संबोधन ऑनलाइन असणार आहे, अशी माहिती रा. स्व. संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करून माहितीही दिली आहे. “ आशा आहे, की आपण सर्वजण सुखरूप असाल. सध्या संपूर्ण देश करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. हे संकट गंभीर असले तरी समाजाकडून मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे. या संकटकाळात भारत हा संपूर्ण जगासमोर एक उत्तम उदाहरण म्हणून उभा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकदेखील एकत्र येत समाजाप्रती आपले योगदान देत आहेत.
सद्य स्थिती पाहता, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बौद्धिक (ऑनलाइन) वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत, असे संघाने म्हटले आहे.