काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून तरुणांनी गिर्यारोहण केले पाहिजे. गिर्यारोहण हे जोखीमचे काम आहे. आपल्यावर येणाऱ्या जोखमी स्वीकारून त्यावर मात करता यायला हवी. गिर्यारोहणामध्ये अपघात होणे स्वाभाविकच आहे. अपघातांना सामोरे जाऊन यश मिळवणे म्हणजेच गिर्यारोहण होय... - सुरेंद्र चव्हाण
पुणे : ‘‘आताच्या तरुणाईची विचारसरणी साहसी आहे. आधुनिक युगातील तंत्रज्ञान आणि शैक्षणिक माहितीचा पुरेपूर फायदा त्यांनी करून घ्यायला हवा. भारतात काशी, दार्जिलिंग आदी ठिकाणी गिर्यारोहणाशी निगडित संस्थांचे मुलभूत प्रशिक्षण देणारे ‘कोर्स’ आहेत. यातून तांत्रिक ज्ञान मिळते. पर्वतरांगा, निसर्ग, हवामान अंदाज आणि गिर्यारोहणाशी संबंधित पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. या सर्वाच्या अभ्यासातून तरुणांनी गिर्यारोहणाचे धडे गिरवावेत आणि त्यानंतर सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करावीत,’’ असा सल्ला महाराष्ट्राचे पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांनी दिला. जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या एव्हरेस्टवर १८ मे १९९८ या दिवशी चव्हाण यांनी भारताचा तिरंगा फडकवला. या अभिमानास्पद रोहणाला एकवीस वर्षे पूर्ण झाली. याच आठवड्यात पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या दहा बहाद्दरांनी जगातील तिसºया क्रमांकाचे सर्वोच्च कांचनजुंगा शिखर सर केले. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.
एकवीस वर्षांपूर्वीचे गिर्यारोहण आणि सध्याचे गिर्यारोहण यात फरक काय? दोन दशकांपूर्वी आर्मीचेच लोक गिर्यारोहण करू शकतात, असा भारतीयांचा समज होता. आम्ही माउंट एव्हरेस्टवर जाण्याआधी बंगालच्या टीमने प्रयत्न केले होते. पुण्यातलेही अनेक गट जाऊन आले. पण ते यशस्वी झाले नाहीत. एव्हरेस्ट चढण्याची आमची पहिलीच मोहीम होती. आमचा तेरा जणांचा संघ होता. त्यातले सातजण चढाई करणार होते. सहा जण मदतीसाठी होते. हवामान खात्याने दिलेल्या अचूक अंदाज घेऊन आम्ही चढाई चालू केली. शेरपांचीही मदत होतीच. आता परिस्थिती बदलली आहे. शरीर तंदुरुस्त असणारी व्यक्ती एव्हरेस्टला जाऊ लागली आहे. आता शेरपा तुम्हाला सर्वोतोपरी मदत करतो. अपघातात वाचवण्यापासून कुठलेही संकट, अडचणी आल्या तरी तो शेवटपर्यंत तुमची साथ सोडत नाही. आता एव्हरेस्ट चढाईचे कुतूहल राहिलेले नाही. अलीकडच्या काळातले सोपे झालेय का? आमच्या एव्हरेस्ट मोहिमेवेळी आर्थिक अडचणी खूप आल्या होत्या. साहित्य गोळा करण्यासाठी सदस्यांनी खूप प्रयन्त केले. कॉपोर्रेट कंपन्याकडून डोनेशन मिळवण्याचा आम्ही प्रयन्त केला. त्यासाठी इतर पर्वतांवर पार पडलेल्या यशस्वी मोहिमांची सादरीकरण दाखवावी लागली. चाळीस ते पन्नास कंपन्यांना दाखवल्यावर एखाद्या कंपनीकडून डोनेशन मिळायचे. आता अनेक संस्था आर्थिक मदत करतात. डोनेशन मिळवण्यात अडचणी येत नाहीत. गिर्यारोहण करणाऱ्या संस्थांनी तरुण मंडळींना तांत्रिक मार्गदर्शन करावे. गिर्यारोहण करताना कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याबद्दलची जनजागृती आवश्यक आहे. सध्याची तरुणाई किल्ले, पर्वतांवर, तसेच जंगलात जाण्यास उत्सुक असते. मात्र एखाद्या किल्ल्यावर कचर्याचे प्रमाण वाढले की तिकडे जाण्यास बंदी घातली जाते. अपघात झाला की सरकारला जबाबदार धरले जाते. प्रत्येक वेळी सरकारला दोष देऊन चालणार नाही. गड, किल्ले, पर्वतांवरील कचरा समस्या दूर सोडवण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. नियमांचे पालन केले तर अपघातही सहसा होत नाहीत. तंत्रज्ञानाच्या, संपर्काच्या प्रगतीमुळे गिर्यारोहणातले धोके टाळण्यासही मदत होते. ....................................................................................................