मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उत्तरोत्तर रंगत असून, महाआघाडी आणि महायुतीमध्ये अक्षरश: शाब्दिक युद्ध सुरू आहे. विशेषत: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला प्रचार आणि प्रसार आता शिगेला पोहोचला असून, विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून आलेल्या पहिल्या व शेवटच्या रविवारी म्हणजे आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची तोफ चांदिवलीसह धारावीत धडाडणार आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मरिन ड्राइव्ह येथे ‘मुंबई चाले भाजपसोबत’ हा कार्यक्रम रंगणार आहे.
चांदिवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी हे साकिनाका येथील लोकमान्य टिळकनगरमध्ये ५ वाजता सभा घेणार आहेत. त्यानंतर, ६.३० वाजता धारावी येथे त्यांची सभा होईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सायंकाळी ७ वाजता मरिन ड्राइव्ह येथे ‘मुंबई चाले भाजपसोबत’ हा कार्यक्रम होईल. वर्सोवा विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार भारती लव्हेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंधेरी पश्चिमेकडील चित्रकूट ग्राउंड येथे सायंकाळी ६ वाजता सभा होईल.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि वरळी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा रोड शो रविवारी सायंकाळी ५ वाजता वरळी येथे आयोजित केला आहे. फिनिक्स मॉल येथून रोड शो सुरू होईल. वरळी पोस्ट आॅफिस समोरून सिद्धार्थनगर येथे तो समाप्त होईल. मागाठाणे विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार नयन कदम यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सायंकाळी ६ वाजता अशोकवन येथे सभा होणार आहे. तर, दिंडोशी विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार अरुण सुर्वे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी ६ वाजता मालाड पूर्वेकडील शांताराम तलाव येथे राज ठाकरे यांची सभा होईल.
राहुल गांधी काय बोलणार?पंजाब आणि महाराष्ट्र बँकेचा घोटाळा, आरेमधील झाडांची कत्तल, बेरोजगारी, तसेच युती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर राहुल गांधी तोफ डागतील.