शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा, अजित पवारांना क्लिन चिट; याचिकाकर्त्याची याचिकेत बदल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:45 AM2024-05-09T09:45:17+5:302024-05-09T09:45:57+5:30
काही दिवसांपूर्वीच ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी मंगळवारी उच्च न्यायालयाकडे मागितली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी आपल्याला करायची आहे, असे तक्रारदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
अरोरा यांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने आपण या याचिकेवर सुनावणी घेऊ शकत नाही, असे म्हटल्याने अरोरा यांना याचिकेत सुधारणा करण्यासाठी पर्यायी खंडपीठाकडून परवानगी घ्यावी लागेल.
तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबई ईओडब्ल्यूने पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यानंतर अरोरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
काही दिवसांपूर्वीच ईओडब्ल्यूने दुसरा क्लोजर रिपोर्ट दाखल करत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार व अन्य बड्या राजकीय नेत्यांना क्लीन चिट दिली. त्यामुळे अरोरा यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. ईडी व सीबीआय या तपास यंत्रणा सरकारी दबावापासून स्वतंत्र नसल्याने एसआयटी नेमण्यात यावी व या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.