सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 04:47 PM2024-06-13T16:47:08+5:302024-06-13T17:17:44+5:30

राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू होती.

Sunetra Ajit Pawar has finally reached Parliament Unopposed in Rajya Sabha three MPs now from Baramati | सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार

सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार

Sunetra Pawar Rajya Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत होती. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांनी आज अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी ३ पर्यंत इतर कोणीही उमेदवारी अर्ज न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत हायव्होल्टेज सामना रंगला होता. मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आलं होतं. सुळे यांच्या भावजय सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात होत्या. पण बारामतीकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावरच विश्वास टाकत त्यांना तब्बल १ लाख ५८ हजार मतांच्या फरकाने विजयी केले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पुढील राजकीय प्रवास कसा असणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांचे नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत आले. मात्र राष्ट्रवादीतील इतर नेतेही या जागेसाठी इच्छुक असल्याने नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत सस्पेन्स होता. अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी आज हा सस्पेन्स संपला आणि राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

दरम्यान, विधिमंडळात महायुतीच्या आमदारांची संख्या जास्त असल्याने राज्यसभेच्या या जागेसाठी महाविकास आघाडीकडून कोणीही अर्ज दाखल करणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. ही शक्यता खरी ठरली आणि सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीचा मार्ग सुकर झाला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणाकोणाची उपस्थिती?

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीमुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी उपस्थित होते.
 
शहर आणि तालुक्यात सर्व संस्थांवर वर्चस्व असताना सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव संस्थेचे प्रमुख, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागला होता. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवार गटात कमालीची शांतता होती. मात्र, आज त्यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. राज्यसभा खासदारकीनंतर सुनेत्रा पवार यांची केंद्रीय मंत्रीमंडळातही वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार गटाला आणखी बळ मिळणार आहे.
 

Web Title: Sunetra Ajit Pawar has finally reached Parliament Unopposed in Rajya Sabha three MPs now from Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.