लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे अन्वेषण कक्षाने (ईओडब्ल्यू) दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या ५० याचिका आता दाखल करण्यात येणार असल्याचे वकिलांनी विशेष न्यायालयाला गुरुवारी सांगितले.
ईओडब्ल्यूच्या क्लोजर रिपोर्टला ईडीनेही विरोध केला आहे. माणिकराव जाधव यांनीही विरोधाची भूमिका घेतली आहे. क्लोजर रिपोर्टविरोधात आणखी ५० याचिका दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती माणिकराव जाधव यांच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी विशेष न्यायालयाचे न्या. ए. यू. कदम यांना दिली. यासाठी वेळ हवा असल्याने सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती तळेकर यांनी न्यायालयाला केली. पुढील सुनावणी ३१ ऑगस्टला ठेवली.