मुंबई : बारामती लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. ही जागा राष्ट्रवादीने लढण्याबाबत महायुतीत निर्णय झाल्यास सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादीच्या बारामतीतील उमेदवार असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलाविली होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा जनाधार आहे तिथे आपण निवडणूक लढावी अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याचे तटकरे यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून महायुतीच्या जागा वाटपाबाबत त्यांच्याशी चर्चा अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीत दिंडोरी, नाशिक, धाराशिव, हिंगोली, ईशान्य मुंबई, रायगड या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास व्यक्त करतानाच ४५ चा निर्धार करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असेही तटकरे म्हणाले.