महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 11:13 AM2024-05-07T11:13:37+5:302024-05-07T11:27:01+5:30
Sanjay Raut Talk on Sunetra Ajit pawar: भाजपचे 20 ते 25 आमदार ठाकरे फोडण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचल्याच्या आरोपांवर राऊत यांनी मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे, अशी टीका केली आहे.
तिसऱ्या टप्प्यात सगळे महत्वाचे मतदारसंघ आहेत. त्यात महत्वाचे नेते लढत आहेत. मोदी, शाह सगळे भाषण करून गेले आहेत. या मतदारसंघांत बारामतीवर सर्वांचे लक्ष होते. महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय, असे वाटू लागले होते. काहीही करून शरद पवारांचा पराभव करायचा हे मोदी-शाह यांनी ठरविले आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
बाळासाहेब यांच्यानंतर महाराष्ट्रात एका स्वाभिमानी नेत्याचा, महाराष्ट्राचा आधारवड असलेल्या शरद पवार यांचा बारामतीत पराभव करून दाखवून द्यायचे आहे. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन पैशाच्या ताकदीवर तपास यंत्रणांच्या मदतीने महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केलेला त्यांना दाखवून द्यायचा आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवले आहे. विक्रमी मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील. नारायण राणे यांचा आम्ही आधी पराभव केला आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
भाजपचे 20 ते 25 आमदार ठाकरे फोडण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचल्याच्या आरोपांवर राऊत यांनी मुख्यमंत्री हा एक खोटारडा माणूस आहे, अशी टीका केली आहे. आपल्या स्वार्थासाठी जो माणूस आपल्या आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसतो त्याच्यावरती काय विश्वास ठेवायचा, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. हे डरपोक लोक आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार असतील घाबरून पळालेले लोक आहेत. यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे खटले ईडी, सीबीआय मागे घेऊ लागले आहे. अशा लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही, असे राऊत म्हणाले.