Sunetra Pawar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील टप्प्यांतील मतदानांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. महायुतीची एक मोठी सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील बडे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ ही सभा झाली. या सभेला संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगला विकास केला आहे. सर्व क्षेत्रात मोदींनी आपली विशेष कामगिरी बजावली आहे. मोदी देशासाठी जीव झोकून काम करत आहेत. जनतेच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास आहे. देशातील प्रत्येक वर्गातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. देशातील रस्ते, मंगलयान, चांद्रयान सारख्या मोहिमा ही मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी आणि मोदीच आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया
गेल्या १० वर्षांत बारामतीत झालेली विकास कामे राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून झाली आहेत. गेल्या २५ वर्षांत शिक्षण, आरोग्य क्षेत्रात काम केले आहे. बारामतीचा विकास झपाट्याने झाला आहे. बारामती एक विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे. हा विकास फक्त अजित पवारांच्या दूरदृष्टीमुळे झाला आहे. बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवार जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की, त्यांची क्षमता राज्यातील जनतेला माहिती आहे. बारामतीतील जनतेने हा ध्यास अनुभवला आहे. अजित पवारांनी विकासाच्या यात्रेत जाण्याचा निर्णय घेतला आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित पवार आहेत. बारामातीचा विकास हा अजित पवाराच्या ध्येय धोरणांनी झाला आणि त्याच्या कल्पनेतून झाला. घडाळ्याला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत आहे. मोदींना मत म्हणजेच विकासाला मत आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.