Sunetra Ajit Pawar News: गेल्या दोन टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विकास केला आहे, त्यामुळे जगभरात त्यांची ओळख विकासपुरुष म्हणून झाली आहे. अजित पवार यांनी त्यांनाच साथ द्यायचे ठरवले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि विकासाचे पाईक होण्यासाठी आम्ही सगळ्यांना भेटत आहोत, असे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. जागावाटपावरून महायुतीत अद्यापही सस्पेन्स कायम असला, तरी बारामतीची जागा अजित पवार गटाकडेच राहील, असे सांगितले जात आहे. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते, असे म्हटले जात आहे. सुनेत्रा पवार यांनी आता प्रचारकार्यात सक्रीय सहभाग घेतला असून, विविध भागांमध्ये दौरे, बैठका सुरू आहेत. यातच मीडियाशी बोलताना सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत का?
अजित पवार यांचे कार्यकर्ते किंवा समर्थक हे नेहमी अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त करत असतात. अजितदादा मुख्यमंत्री व्हायला हवेत, असे तुम्हालाही वाटते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होवो, असे साकडे देवाचरणी घातले आहे, असे सूचक उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिली. तसेच विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात असताना प्रचारात तुम्हाला कसा अनुभव येत आहे, असेही सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आले. यावर, चांगला अनुभव येत आहे. जिथे जिथे जाते, तिथे दादांनीच विकास केला आहे, असे लोक आवर्जून सांगतात, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
दरम्यान, भोर तालुका असो वा अन्य तालुके असो, वाड्या-वस्त्यांवरती जो विकास झाला आहे, तो दादांच्या मार्फत तेथील आमदार, स्थानिक नेते असतील, त्यांनी केला आहे. विकासाचा मुद्दा पुढे नेत असताना लोकच आमच्याकडे विकास झाला आहे, असे आवर्जून सांगतात, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली.