मुंबई - माझ्या उमेदवारीचा निर्णय सगळ्यांनी बैठक घेऊन घेतला आहे, त्याबद्दल पक्षात कोणतीही नाराजी नाही. छगन भुजबळ माझा अर्ज भरायला होते, त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आहेत. जनतेतून मागणी झाल्याने मला लोकसभेची उमदेवारी देण्यात आली होती. आताही या उमेदवारीसाठी जनतेतून मागणी करण्यात आली होती, असे सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
अजित पवार गटाच्या संसदीय मंडळाची बैठक बुधवारी रात्री पार पडली. या बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले. सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून दिल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
अर्ज भरण्यासाठी अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भजुबळ, दिलीप वळसे-पाटील, धर्मरावबाबा आत्राम, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते.
भुजबळ अजिबात नाराज नाहीत. या बातम्या कोण पसरवतात? उमेदवारीबाबत मित्र पक्षांना कळवले होते. त्यांच्यापैकी कोणालाही निमंत्रण दिले नव्हते.- प्रफुल्ल पटेल, खासदार
सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. पक्षात नाराजी असण्याचे कारणच नाही. पक्षाच्या हिताच्यादृष्टीने आणि भविष्याचा सारासार विचार करून निर्णय घेतला गेला आहे. महायुतीतही नाराजी अजिबातच नाही.- सुनील तटकरे, खासदार