ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 15 - येथील तावरजा नदीवर रुंदीकरण आणि खोलीकरणावरुन सुरू झालेला वाद मिटायचे नाव घेत नाहीये. श्री. श्री. रविशंकर परिवारच्या आर्ट आॅफ लिव्हींगने हे काम केल्याचे सांगितले जाते. त्यात 'सनफ्लॉवर वेल्फेअर फाऊंडेशन'नेही आम्हीच काम केल्याचा दावा करुन काही दिवसांपूर्वी तावरजाच्या पुलावर बॅनर लावले होते. शुक्रवारी छावाच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर जाळून आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून तावरजा नदीच्या खोलीकरणाचे काम आम्हीच केले असा दावा सनफ्लॉवर फाऊंडेशनच्या संगीता लातूरकर यांनी केला होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सुरुवातीला हे काम श्रीश्री रविशंकर परिवाराने केल्याचे सांगितले. यानंतर लातूकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने नदी खोलीकरणासाठी परवानगी दिलेली पत्रेच पत्रकारांना दाखविली होती. यानंतर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी कामाच्या श्रेयावरुन वाद उत्पन्न केल्याचे कारण दाखवित त्यांच्याशी केलेला आपल्या कार्यालयाचा पत्रव्यवहार रद्द केला होता. मात्र त्यानंतर सनफ्लॉवर फाऊंडेशनच्या वतीने तावरजा नदीच्या पुलावर आपले बॅनर लावले होते. शुक्रवारी छावाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश गोमचाळे यांच्या नेतृत्वाखाली सनफ्लॉवर फाऊंडेशनचे बॅनर जाळण्यात आले. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळला आहे. सनफ्लॉवर फुकटचे श्रेय लाटतेय : गोमचाळे सनफ्लॉवर फाऊंडेशनने २७ किलोमीटरचे काम १५० मजुर व १५ जेसीबीच्या सहाय्याने केल्याचा दावा करते. मग त्यातील वाळू, मुरुम, गाळ, माती हे गौण खनिज गेले कुठे ? याला त्ळांनी टिप्परच वापरले नाहीत. मांजरा नदीचे १८ किमीचे काम खोलीकरणासाठी पाच महिन्याचा कालावधी लागतो, मग सनफ्लॉवरने २७ किमीचे काम एक महिन्यात कसे केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेला दिलेल्या कामाच्या मान्यतेचाही खुलासा करावा, अशी मागणी केली आहे. आंदोलनाशी आमचा संबंध नाही : आर्ट आॅफ लिव्हिंगतावरजा नदीवर आम्ही काम केले आहे. परंतु श्रेय घेणाऱ्याचे बॅनर जाळणाऱ्याशी आमचा संबंध नाही. आम्ही आपले काम करतो. हिंसक कृत्य करीत नाही. संपूर्ण २० किमीचे काम आर्ट आॅफ लिव्हींगने २०१४-१५ या वर्षात केले असून पहिल्या वर्षी साडेबारा किमी तर दुसऱ्या वर्षी साडेसात किमीचे काम केले. हे सगळ्या लातूरकूरांना माहीत आहे. त्यामुळे कुणी केलेल्या दाव्याकडे आम्ही गांभीर्यानेही पहात नाही, असे आर्ट आॅफ लिव्हींगचे महादेव गोमारे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. बॅनर जाळले, माझे काम कसे जाळणार : संगीता लातूरकर हे काम छावाच्या कार्यकर्त्यांचे नसून सुपारीदेऊन केले गेले आहे. माझ्या कामाला प्रत्येक गावातील शेतकरी साक्षीदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मी प्रत्यक्ष काम केले आहे. माझे बॅनर जाळाला पण काम कसे जाळणार ? असा सवाल संगीता लातूरकर यांनी करुन मी काही गुंडगिरी करणार नाही, कायद्याने उत्तर देणार असल्याचे सांगितले.
लातूरमध्ये छावा कार्यकर्त्यांनी जाळले सनफ्लॉवर फाऊंडेशनचे बॅनर
By admin | Published: July 15, 2016 5:59 PM