मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जिल्ह्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारताना भारतीय जनता पक्षाची पुरती वाताहत केली. नागपूरमधील विजयाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. मात्र या विजयात पहिल्यांदाच मंत्रीमंडळात सामील करण्यात आलेले सुनील केदार महत्त्वपूर्ण ठरले.
नागपुरात आघाडीने 58 पैकी 40 जागांवर विजय मिळवला. यामध्ये काँग्रेसने 30 तर राष्ट्रवादीने 10 जागांवर विजयाची पताका लावली. मंत्री केदार यांच्या मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या सर्व 9 जागा काँग्रेसने जिंकल्या. तर 18 पंचायत समिती जागांवरही काँग्रेसचे उमेदवारी विजयी झाले. तर भाजपला 15 जागांवर समाधान मानावे लागले.
मंत्री केदार यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी घेतली होती. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची गडबड सुरू असताना केदार यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्हा पायाखाली घातला होता. त्यांच्या झंझावाती प्रचाराचा काँग्रेस पक्षाला फायदा झाला. अनेक सर्कलमध्ये काँग्रेसने शिरकाव केला आहे. नागपूर जिल्हा परिषदेतील निकाल देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.