सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:14 AM2024-11-08T00:14:31+5:302024-11-08T00:15:32+5:30
नागपूर (पारशिवनी): काँग्रेस नेते सुनील केदार यांना राजेंद्र मुळक यांचा कळवळा होता तर त्यांनी सावनेर येथून आपल्या पत्नीऐवजी मुळकांना ...
नागपूर (पारशिवनी): काँग्रेस नेते सुनील केदार यांना राजेंद्र मुळक यांचा कळवळा होता तर त्यांनी सावनेर येथून आपल्या पत्नीऐवजी मुळकांना तिकीट द्यायला हवे होते. कामठी येथून लढवायला हवे होते. केदारांच्या पोटात कपट आहे. त्यांनी महाविकास आघाडीशी विश्वासघात केला, अशी टीका उद्धवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी केली.
पारशिवनी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. मुळकांना उतरविल्यावरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भात तणावाचे वातावरण आहे. याचे पडसाद उमटत आहेत. व्यासपीठावर उद्धवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, शिवसेना कधीही पाठीमागून वार करीत नाही. कळमेश्वर येथील सभेत आम्ही महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकून आणू, अशी शपथ केदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतली होती. ती शपथ केदार विसरले. आम्ही लोकसभेत रामटेकची जागा मोठ्या मनाने काँग्रेसला दिली. श्यामकुमार बर्वे यांना निवडून आणले; परंतु आता बंडखोराच्या मागे केदार व बर्वे उभे आहेत. शिवसैनिक पेटून उठला तर तो कुणाचेही एकत नाही. सरकारने पाण्यापासून तर कफनपर्यंत टॅक्स लावला आहे. कापसाला भाव नाही. आमचा लढा गद्दारांशी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला ताकद देण्याचे आवाहन जाधव यांनी केले.