सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:54 PM2023-11-23T12:54:48+5:302023-11-23T12:55:25+5:30

काल दिवसभर सुनिल प्रभू यांची उलटतपासणी शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली. आज पुन्हा हे सर्वजण विधानभवनात दाखल झाले आहेत. आज पुन्हा प्रभू यांची उलटतपासणी घेतली जाणार आहे.

Sunil Prabhu's Complaint Against Assembly Speaker; 16 days in hand, Rahul Narvekar is also upset with the slowness in Mla Disqualification hearing eknath Shinde vs uddhav Thackeray | सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज

सुनिल प्रभूंची विधानसभा अध्यक्षांविरोधात तक्रार; 16 दिवस हातात, संथगतीवर नार्वेकरही नाराज

सुनावणीवेळच्या संथगतीवर विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आज ठाकरे गटाचे आमदार आणि तत्कालीन एकसंध शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पक्षपातीपणा करत असून शिंदे गटाला झुकते माप देत असल्याचा आरोप केला आहे. याची रितसर तक्रार प्रभू यांनी विधानभवनाकडे केली आहे. 

साक्षी, पुरावे, प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी ठराविक वेळ दिलेली असताना नार्वेकर हे शिंदे गटाला वाढीव वेळ देत आहेत. यामुळे कारवाईस विलंब होत आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या हातात आता फक्त १६ दिवस राहिले आहेत. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे नार्वेकरांनाही सुनावणी लवकर संपवायची आहे. परंतू त्यास विलंब होत असल्याने ते देखील नाराज झाले आहेत. 

काल दिवसभर सुनिल प्रभू यांची उलटतपासणी शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली. आज पुन्हा हे सर्वजण विधानभवनात दाखल झाले आहेत. आज पुन्हा प्रभू यांची उलटतपासणी घेतली जाणार आहे. आजही शिंदे गटाचे वकील राम जेठमलानी यांचा रोख प्रभू यांनी बजावलेल्या व्हिपवर असण्याची शक्यता आहे. कारण प्रभू यांचा व्हिपच शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाईसाठी मोठे शस्त्र आहे. तेच निकामी केले तर शिंदे गटाचे आमदार सुखरूप यामधून सुटू शकतात. यामुळे शिंदे गट सुनिल प्रभूंना शब्दांच्या कचाट्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे.

सुनिल प्रभूंनी २० तारखेला व्हिप जारी केल्याचे म्हटले आहे. परंतू, व्हिपवर २१ तारीख आहे. यावरून देखील प्रभूंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जेठमलानी यांनी केला होता. परंतू, प्रभू यांनी रात्री उशिरा बैठकीचे आदेश आले, यावरून सर्वांना व्हिप जारी करेपर्यंत रात्रीचे १२ वाजले, यामुळे व्हिपवर २१ तारीख लिहिल्याचे चपखल उत्तर प्रभू यांनी दिले आहे. तसेच व्हिपवेळी सोबत १२ आमदार कोण कोण होते, असा प्रश्नही जेठमलानी यांनी विचारला होता. यावर देखील प्रभू यांनी आमदारांची नावे आणि जे संपर्कात नव्हते त्यांना सिस्टिमनुसार व्हिप जारी केल्याचे म्हटले आहे. 

Web Title: Sunil Prabhu's Complaint Against Assembly Speaker; 16 days in hand, Rahul Narvekar is also upset with the slowness in Mla Disqualification hearing eknath Shinde vs uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.