Sunil Raut Replied BJP And Shinde Group: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाले असून, आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लंडनला गेल्याचे वृत्त आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेते आणि भाजपा नेत्यांनी टीका केली. या टीकेचा ठाकरे गटाकडून खरपूस शब्दांत समाचार घेण्यात आला.
केवळ वर्षा बंगल्यावर बसून कामे होत नाहीत. छत्रपती संभाजीनगरला बैठक घेतली. त्यानंतर मुंबईत महापालिकेच्या बैठकीला आलो. दोन दिवसांनतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाची एक महत्त्वाची बैठक आहे. मान्सून पूर्व काळजी घ्यायला हवी, ती घेतली पाहिजे. मी लंडनला जाऊ शकत नाही. मला मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे राज्यात काम करावे लागेल, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला होता. याला ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सुनील राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
एकनाथ शिंदे लंडनला काय महाराष्ट्राच्या बाहेरही पडू शकत नाहीत
लंडनला जाण्यासाठी इंग्लिशमध्ये बोलावे लागते. तेथे मराठी आणि हिंदी भाषेत बोलणार का? ज्यांना लंडनला पोहोचता येत नाही तेच असे म्हणतात. त्यांना माहिती आहे जर लंडनला गेलो, तर बाकीच्या ४० गद्दारांमध्ये फाटाफूट होईल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनला काय महाराष्ट्राच्या बाहेरही पडू शकत नाहीत, असे प्रत्युत्तर सुनील राऊतांनी दिले. तसेच उद्धव ठाकरे लंडनला जाऊन तिथल्या नालेसफाईची आकडेवारी देणार आहेत का? अशी विचारणा भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली होती. यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत १०० वेळा जगभ्रमंती केली. त्यांनी हे दौरे कशासाठी केले? ते परदेशात काय करायला गेले होते? उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर जात असतील तर यांच्या पोटात का दुखते? नरेंद्र मोदी दरवर्षी ५० वेळा परदेश दौऱ्यावर जातात. मग तुम्ही त्यांना काय सल्ला देणार आहात? असा प्रतिप्रश्न राऊतांनी केला.
दरम्यान, आशिष शेलार आणि एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला द्यावा की, हा आपला देश आहे आणि त्यांनी निवडणुकीच्या आधी देशातल्या नागरिकांना जी वचने दिली होती, आश्वासने दिली होती, गॅरंटी दिली होती ती पूर्ण करायला हवी. त्यासाठी त्यांनी इथे बसून ते कामे करायला हवीत. उगीच उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारायला जाऊ नये. नरेंद्र मोदी जगभर फिरतात ते तुम्हाला चालते. आम्ही त्यावर काही आक्षेप घेतो का? उद्धव ठाकरे लंडन दौऱ्यावर गेले तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? त्याऐवजी तुम्ही पंतप्रधानांना जाऊन सल्ले द्या, आम्हाला नको, या शब्दांत राऊतांनी निशाणा साधला.