पवारांच्या भूमिकेबद्दल खळबळजनक दावे; अजितदादांसमोरच सुनील तटकरे कडाडले, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:24 PM2023-11-30T12:24:51+5:302023-11-30T12:25:33+5:30
सरकारमध्ये सहभागी होण्याच्या अजित पवारांच्या निर्णयाची पाठराखण करत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
कर्जत : राष्ट्रवादीत पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अजित पवार गटाने आज कर्जतमध्ये राज्यव्यापी शिबिराचं आयोजन केलं असून या शिबिरात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाची पाठराखण करत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल अनेक खळबळजनक दावे केले आहेत. तसंच अजित पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांना आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होऊन आम्ही काहीतरी महापाप केल्याचा आरोप होत आहे. मात्र शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्षांसह सर्व आमदारांनी सह्या करून भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी एक निवेदन तयार केलं होतं. यामध्ये शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेचे एकमेव नेते म्हणवून घेणाऱ्या ठाणे परिसरातील नेत्याचाही समावेश होता. तेव्हा एक समिती स्थापन करून भाजपसोबत युतीच्या चर्चेसाठी आम्हाला आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मुभा देण्यात आली होती. पण नंतर तो निर्णय बदलण्यात आला," असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे.
'२०१६-१७मध्येही झाला होता प्रयत्न'
भाजपसोबत युती करण्यासाठी याआधी अनेक प्रयत्न झाल्याचे सांगताना सुनील तटकरे म्हणाले की, "२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे पूर्ण निकाल हाती येण्याआधीच मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला आणि प्रफुल्ल पटेल यांना आमच्या नेतृत्वाने सूचना दिली की, भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर करा. भाजपने न मागताही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर साहेबांनी सांगितल्यानुसार मी अलिबागला पक्षाचं एक शिबीर बोलावलं. त्या शिबिरातही भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली. २०१६ मध्ये आम्हाला पुन्हा सांगण्यात आलं की आपल्याला भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी व्हायचं आहे. लोकसभेचं जागावाटप, मंत्रिपदांचं वाटपही ठरलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी काही घडामोडी घडल्या आणि आपण सरकारमध्ये सहभागी होऊ शकलो नाही," असा दावा तटकरेंनी केला.
'आरोप झाल्यानंतर पक्ष पाठीशी उभा राहिला नाही'
"आघाडी सरकारमध्ये मी, अजित दादा आणि छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. मात्र त्या काळात पक्ष आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला नाही. एकच गोष्ट १०० वेळा सांगितल्याने लोकांनाही ती खरी वाटू लागली," अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी शरद पवारांबद्दल अप्रत्यक्षरित्या नाराजी बोलून दाखवली आहे.
'अजितदादांबद्दल तो अत्यंत वाईट शब्द वापरला गेला'
राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केल्याने सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंने एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. यावेळी अजित पवार यांचं पक्षसंघटनेसाठी योगदान नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तसंच ते भेकड असल्याचंही म्हटलं गेलं. यावर बोलताना सुनील तटकरेंनी म्हटलं की, "निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना काल अजितदादांबद्दल दुर्दैवाने एक शब्द वापरला गेला. त्या शब्दाचा अर्थ अत्यंत तिखट आहे. पण तो मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुमचंही रक्त खवळलं पाहिजे. युक्तिवादात अजित पवार हे भेकड असल्याचं म्हटलं गेलं. हे तुम्हाला मान्य आहे का? अजितदादा जर भेकड असते तर सरकारमध्ये सहभागी होण्याची हिंमत दाखवू शकले नसते. अजितदादांचा निर्णय कसा क्रांतीकारी आहे, हे आपल्याला आता कृतीतून दाखवून द्यावं लागेल. त्यासाठीच आपण हे दोन दिवसीय अधिवेशन बोलावलं आहे."
दरम्यान, "पहाटेच्या शपथविधीवेळीही अजित पवारांबद्दल संशयाचं मळभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ५ जुलै रोजी एमईटी येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका जाहीर केल्याने ते सगळं मळभ दूर झालं," असंही सुनील तटकरे म्हणाले.