मुंबई : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीयांना सुसह्य जीवनाचे स्वप्न दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर केला. तर अर्थव्यवस्थेतील मंदी दूर होऊन बाजारपेठेत मागणीला उभारी यावी यासाठी लोकांच्या व कंपन्यांच्या हाती अधिक पैसा येण्याच्या अनेक योजना जाहीर केल्याचा दावा भाजपने केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प ६.0९ लाख महसुली कोटी तुटीचा असून, वित्तीय तूट ७.९६ लाख कोटी रुपये आहे. मात्र केंद्र सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा नाही. गेल्या अर्थसंकल्पामध्येही नुसता घोषणांचा पाऊस पाडला होता. आताही तेच काम या सरकारने केले आहे. शेतीचे उत्पन दुप्पट करण्याचे त्यांनी आधी सांगितले होते. त्याचे काय झाले, असा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित केला.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, करदात्यांना फक्त सवलत देण्याचा प्रयल केल्याचे दिसून येते. रोजगारवाढीसाठी कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. आर्थिक वृद्धीचे नुसते चित्र रंगवण्यात आले आहे. त्यामध्ये शाश्वती नाही. तर हा फक्त अपेक्षा उंचावणारा अर्थसंकल्प असल्याची टीका तटकरे यांनी यावेळी केली.