भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:30 PM2023-12-01T12:30:31+5:302023-12-01T12:30:57+5:30

Sunil Tatkare : आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे महापाप केले, असा दावा केला जात आहे, पण यापूर्वी किमान चार वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो शेवटच्या क्षणी फिरवण्यात आला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला.

Sunil Tatkare explains that he did not commit a sin if he went with BJP | भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण

भाजपसोबत गेलो म्हणजे पाप केले नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण

कर्जत - आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो म्हणजे महापाप केले, असा दावा केला जात आहे, पण यापूर्वी किमान चार वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो शेवटच्या क्षणी फिरवण्यात आला, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या निर्णयाची पाठराखण करतानाच शरद पवार यांनी वेळोवेळी बदललेल्या भूमिकांचा संदर्भ देत हा निर्णय का घेतला त्याचे समर्थन केले.

ध्वजारोहण झाल्यावर या शिबिराला सुरुवात झाली. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

‘संकट काळात आमच्या पाठीशी पक्ष उभा राहिला नाही’
२०१४ मध्ये भाजपने न मागताच राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. २०१६ मध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता. तो ऐनवेळी फिरवण्यात आला. पहाटेच्या शपथ विधीबाबतही अजित पवार यांनाच खलनायक ठरवले गेले. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले तेव्हाही भाजपसोबत जाण्याबाबत निवेदन तयार केले होते. त्यावर तर फुले-शाहू महाराज-आंबेडकरांचे एकमेव वारस असल्याचा दावा करणाऱ्या ठाण्यातील नेत्यांचीही सही होती, असे तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेता स्पष्ट केले. नंतरही आघाडी सरकारमध्ये अजित पवार, मी, छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा पक्ष पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत तटकरे यांनी व्यक्त केली. दरम्यान, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप याच महिन्यात पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणीदरम्यान अजित पवार यांचा भेकड, असा उल्लेख केला, पण त्यांचे नेतृत्व सक्षम आहे म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार त्यांच्यासोबत आहेत, याकडे तटकरेंनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. देशात भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात, आपल्या वैचरिक भूमिकेशी तडजोड करत नाहीत. मग आम्हीही तसे पाऊल उचलले तर ते चुकीचे कसे, असा प्रश्नही तटकरेंनी विचारला.

Web Title: Sunil Tatkare explains that he did not commit a sin if he went with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.